लहान मुलांची डोकी फिरली, शांतता भंग झाली! रणवीरच्या नग्न फोटोशूटविरोधात जनहित याचिका दाखल

अभिनेता रणवीर सिंह याच्या नग्न फोटोशूटमुळे खळबळ उडाली होती. अंगावर एकही कपडा न घालता रणवीरने फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटवर काहींनी आक्षेप नोंदवला तर काहींना त्याच्या ‘बोल्ड’ निर्णयाचं स्वागत केलं. रणवीर सिंह याचे नग्न फोटोशूट न आवडल्याने कोलकाता उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. रणवीर याचे आक्षेपार्ह फोटो प्रसारीत करणे रोखा अशी मागणी या जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

नाजिया इलाही खान यांनी ही याचिका दाखल केली असून यामध्ये त्यांनी म्हटलंय की पैसा कमावण्यासाठी अभिनेत्याने शांततेचा भंग केला, त्याच्या या कृतीमुळे लहान मुलांची डोकी फिरली आहेत. इतकंच नाही तर याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की या फोटोशूटमुळे महिलांचा विनयभंग झाला आहे. रणवीर याच्या फोटोशूटवर सक्षम यंत्रणांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्याने म्हटलंय की रणवीरचे फोटो अश्लील होते आणि सदर प्रकरण हे आयपीसी 294 अंतर्गत मोडतं.