बलात्कारानंतर पिडीत महिला निराश न झाल्याने आरोपीला जामीन

34

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

एका महिलेवर बलात्कार झाल्यानंतर तिने काही दिवसांत तिच्या नवऱ्यासोबत आनंदी मुद्रेतील फोटो काढून सोशल नेटवर्कींग साईटवर शेअर केले, याचा आधार घेत आरोपीच्या वकीलांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आणि तो मंजूर देखील झाला. या वकीलांनी कोर्टासमोर युक्तिवाद सादर केला की बलात्कारानंतर कोणतीही महिला नैराश्याने ग्रासली जाते, त्याला कायदेशीर भाषेत रेप ट्रॉमा सिन्ड्रोम म्हणतात. मात्र या घटनेतील पिडीत महिलेबाबत असं कोणतंही लक्षण दिसत नाहीये. ती फोटोमध्ये अत्यंत खूष दिसत असून तिने केलेली बलात्काराची तक्रार ही खोटी असल्याचं आरोपीच्या वकीलांना कोर्टासमोर सांगितलं. त्यांच्या या युक्तिवादामुळे आरोपीला हा जामीन मंजूर करण्यात आला.

पिडीत महिलेने २३ मार्च रोजी आपल्यावर बलात्कार झाला असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र ४ ते ७ जून दरम्यान या महिलेने नवऱ्यासोबत आनंदी मुद्रेतील फोटो शेअर केले. हे फोटो अपलोड केल्याने आणि फोटोंमध्ये महिला आनंदी दिसत असल्याने ती अजिबात निराश नसून तिच्यावर बलात्कारच झाला नाही असं आरोपीच्या वकीलांनी कोर्टात सांगितलं. आरोपी आणि पिडीत महिलेमध्ये संपत्तीवरून वाद सुरू आहे. ही गोष्ट देखील आरोपीला जामीन मिळण्यात महत्वाची ठरली.

आपली प्रतिक्रिया द्या