नालंबी टेकडीवर चोर, लुटारूंची दहशत; हत्या, बलात्कारानंतर पोलीस यंत्रणा जागी

सामना प्रतिनिधी । टिटवाळा

प्रियकराची हत्या करून प्रेयसीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर नालंबी टेकडीवरील गुन्हेगारी कारवायांकडे अखेर पोलिसांचे लक्ष पोहोचले आहे. अंबरनाथ आणि टिटवाळाच्या हद्दीवर ही टेकडी असल्याने कारवाई करायची कोणी यावरून या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये हद्दीचा वाद सुरू आहे. त्यामुळे चोर, लुटारू आणि गर्दुल्ल्यांचे फावले असून खून, बलात्कार करण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली असल्याचा आरोप परिसरातील रहिवासी करत आहेत. दरम्यान टिटवाळा पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार केली आहेत. टेकडीसोबतच आसपासची गावे व परिसर पिंजून काढण्यात येत आहे.

अंबरनाथहून नालंबीमार्गे टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. शहराच्या दगदगीपासून शांतता मिळवण्यासाठी अनेक जण या रस्त्यावर येतात. यात सर्वाधिक संख्या असते ती प्रेमीयुगुलांची. एकांत मिळवण्यासाठी या रस्त्यात भरपूर जागा असल्याने अंबरनाथ आणि परिसरातून अनेक प्रेमीयुगुलं इथं येतात आणि झाडाझुडपात, खोल दऱ्यांमध्येही उतरून बसतात. मात्र हाच प्रकार शहापूरचा रहिवासी असलेल्या गणेशच्या जिवावर बेतला. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास गणेश आपल्या प्रियसीसोबत दुचाकीवर बोलत बसलेला असताना त्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आलेल्या एकाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. त्यानंतर बंदूक दाखवतच त्या लुटारूने तरुणासोबत असलेल्या प्रियसीवर जबरदस्तीने बलात्कार केला. यावेळी प्रियकर विरोध करत असताना लुटारूने आपल्याकडे असलेल्या बंदुकीने त्या मुलीच्या प्रियकरावर गोळी झाडली यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत मृत झालेल्या तरुणाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात पाठवला आहे तर पीडित तरुणीवर उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात उपचार चालू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत. दरम्यान या घटनेनंतर पळून गेलेल्या त्या लुटारूच्या शोधात पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत.

नालंबी टेकडीवर घडलेल्या हत्या व बलात्काराच्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
– या घटनेत प्रियकराला मारण्यासाठी चोरट्यांनी पिस्तुलाचा वापर केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. त्यात चोरटे हे स्थानिक गर्दुल्ले किंवा लुटारू असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, पण स्थानिक लुटारूंकडे महागडी पिस्तुलं आली कुठून?
– हा घडवून आणलेला प्रकार तर नसावा ना?
– गणेशप्रमाणेच अनेक प्रेमीयुगुल एकांत मिळवण्यासाठी या भागात येतात. त्यामुळे यापूर्वीही अशा लुटमारीच्या किंवा अत्याचाराच्या घटना घडल्या असतील तर?

पोलीस गस्त वाढवा
कल्याण तालुक्यातील आणे भिसोळामार्गे अंबरनाथला जाणाऱ्या रस्त्यावरील चिंचपाडा ते नालंबी या गावालगतचा रस्ता रात्रीच्या वेळी सामसूम असतो. हा रस्ता पुढे आंबरनाथला निघतो. कल्याण व अंबरनाथ तालुक्यांना जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. मात्र जास्त राहदारी नसलेल्या या परिसरांत पथदिवेदेखील पुरेसे नाहीत लुटमारीच्या घटना यामुळे याआगोदरही घडलेल्या आहेत. तर टिटवाळा आणि अंबरनाथ या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीवर असलेल्या या परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना करण्यात यावी तसेच पोलीस गस्ती पथके वाढवावीत, अशी मागणी या घटनेमुळे आता या परिसरातील नागरिकांतून होत आहे.