भाजप नगरसेवक दया गायकवाड यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार

52

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

कल्याण प्रभाग क्र. पाच, गौरीपाडा विभागाचे भारतीच जनता पक्षाचे नगरसेवक दया गायकवाड यांच्याविरोधात महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. महिलेने ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये महिलेने दया गायकवाड यांचा मित्र मनोज धुमाळ आणि त्यांची पत्ती अश्विनी धुमाळ या तिघांनी फसवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असेही नमूद केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणला वर्तक नगर राहणाऱ्या २७ वर्षाय तरुणीची भाजप नगरसेवक दया गायकवाड यांच्याशी फेसबुकवर ओळख झाली व त्याचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर दया गायकवाड यांनी ‘मला तू आवडते मी तुझ्याशी विवाह करणार आहे’, असे सांगून वारंवार माझ्यावर बलात्कार केला अशी तक्रार महिलेने केली आहे. तसेच या फसवणूकीत नगरसेवक दया गायकवाड यांचा मित्र मनोज व त्याची पत्नी अशविनी धुमाळ हेही सहभागी होते, असे महिलेने म्हटले आहे.

नगरसेवक दया गायकवाड यांचा विवाह झाला असूनही त्यांनी मला सांगीतले नाही. तसेच शरीर सुखासाठी माझी फसवणूक केली असेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान याप्रकरणी नगरसेवक दया गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘तक्रारदार महिलेने माझ्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती, मात्र ती देण्यास नकार दिल्याने माझ्यावर खोटे नाटे आरोप केले जात आहे’, असे दया गायकवाड म्हणाले. तसेच यासंदर्भात मी यापूर्वीच पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या