भाजप जिल्हा सरचिटणीसाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । गडचिरोली
चालत्या बसमध्ये तरुणीशी अश्लिल चाळे करणाऱ्या भाजपच्या जिल्हा सरचिटणीसाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र बावनथडे असे त्याचे नाव असून तो भाजपचा गडचिरोलीतील जिल्हा सरचिटणीस व माजी महासचिव आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल साईटवर व्हायरल झाला आहे. यानंतर बावनधडे फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरमोरीत पत्रकार परिषद घेऊन बावनथडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत नागपूरहून येणाऱ्या एका बसमध्ये मागच्या सीटवर बसलेली ५० वर्षीय व्यक्ती एका तरुणीसोबत अश्लिल चाळे करत असल्याचे दिसत आहे. ही व्यक्ती भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडे असल्याचे समोर आले. त्यानंतर व्हिडिओत दिसणाऱ्या मुलीने बावनथडे यांनी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आणि चंद्रपूर येथील नागभिड पोलिस ठाण्यात बावनधडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २७ जूनला नागपूरहून नागभिडकडे जाणाऱ्या एका खासगी बसमधून बावनथडे संबंधित तरुणीबरोबर प्रवास करत होता. प्रवासादरम्यानच त्याने  तरुणीशी अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. हा प्रकार बसमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर बस कर्मचाऱ्यांनी तो बघितला. नंतर तो सोशल साईटवर व्हायरल झाला.