नगर जिल्हा हादरला, शिर्डीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर दीड वर्षापासून अत्याचार

3501
फोटो - आरोपी संदीप लालचंद गोपालवत

देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना नगर जिल्ह्यातील शिर्डीसारख्या तिर्थस्थानी एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी पीडित मुलीच्या आईने पोलिसांमध्ये फिर्याद दिल्याने या घटनेला वाचा फुटली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आईसोबत शिर्डीमध्ये वास्तव्यास आहे. पीडितेची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवते. यादरम्यान पीडिता आणि तिच्या आईची ओळख आरोपी संदीप गोपालवत याच्याशी झाली. आरोपीचे पीडितेच्या घरी येणे-जाणे सुरू होते. पीडितेची आई घरात नसल्याचे पाहून आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास आरोपीने पीडितेला ठार मारण्याचीही धमकी दिली. पीडितेच्या भोळेपणाचा फायदा घेत गेल्या दीड वर्षापासून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता.

अत्याचार सहन न झाल्याने पीडितेने याबाबत आईला सांगितले. यामुळे पायाखालची जमीन सरकलेल्या आईने आरोपीकडे याबाबत जाब विचारला असता त्याने तिलाही ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर त्यांनी तडक शिर्डी पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. शिर्डी पोलीस स्थानकातील सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी यांनी तात्काळ एक पथक पाठवून आरोपी संदीपला राहत्या घरातून अटक केली.

पोलिसांनी आरोपीविरोधात भादवी कलम 376 (2), 504, 506 तसेच अनुसुचित जाती-जमाती प्रति आधीचे कलम 3 (1),(२) ३ (२)(5) अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला गुरुवारी राहाता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या