पोलीस असल्याची बतावणी करून विवाहितेवर बलात्कार

सामना प्रतिनिधी । पिंपरी

महापालिका अग्निशामक दलातील फायरमनने पोलीस असल्याची बतावणी करून चिंचवड येथील विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले बलात्कार केल्याची घटना उघड झाला आहे. तसेच तिच्याकडून २ लाख रुपयेही लुबाडले. निगडी पोलिसांनी आरोपीला गजााआड केले आहे. स्वप्नीलकुमार शहाजी थोरात (वय २७, रा. वृंदावन वसाहत, आळंदी) असे अटक केलेल्या फायरमनचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला पिंपरी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

चिंचवड-संभाजीनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेने आरोपी विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संबंधित महिला विवाहित असून मुळची वर्धा येथील रहिवासी आहे आहे. आरोपी थोरात याच्याशी तिची ओळख झाली. थोरात याने तिला आपले खरे नाव न सांगता पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून, वेळोवेळी धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेवर कासारवाडी, आकुर्डी येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला. याशिवाय दोघांचे एकत्रित काढलेले फोटो तिच्या नवऱ्याला पाठविण्याची धमकी दिली. तिच्याकडून २ लाख १५ हजार रुपयेही घेतले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.