जामखेडमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता दीड महिन्यांची गर्भवती

2327
प्रातिनिधिक फोटो

दोन महिन्यांपूर्वी आजी-आजोबांकडे शेतात जात असताना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये घडला आहे. पीडिता दीड महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपीच्या भावासह दोघांवर जामखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय उर्फ दादा पोपट घुगे (वय – 21, रा. आनंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे, तर दुसरा आरोपी अल्पवयीन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथे एक तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी दादा घुगे याने दोन महिन्यांपूर्वी मुलीच्या घरी व त्यानंतर एक महिन्यांपूर्वी पीडीता आपल्या आजी व आजोबांकडे जात असताना भावाच्या मदतीने बलात्कार केला होता. आरोपीने पीडितेवर दोनदा बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या भावांना ठार मारून टाकेन अशी धमकीही दिली. यामुळे घाबरलेल्या पीडितेने दोन महिन्यानंतरही हा प्रकार कोणाला सांगितला नाही.

दोन दिवसांपूर्वी 11 मार्चला पीडिता रडत असताना तिच्या आईने याबाबत विचारले असता तिने सर्व प्रकार कथन केला. यामुळे कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. सदल मुलीला जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता पीडिता दीड महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर 12 मार्चला कुटुंबीयांनी पीडितेसह जामखेड पोलीस स्थानकात हजर होत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसानी आरोपीसह त्याच्या भावावरही गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी विजय घुगे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या