अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

17

सामना प्रतिनिधी, नाशिक

दोन वर्षांपूर्वी पिंपळगाव-बसवंत येथे १२वर्षीय मुलीवर वेळोवेळी अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी नराधम नातेवाईकाला काल निफाड सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व कारावासाची शिक्षा दिली आहे. या गुन्ह्यात या नराधमासोबतच दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश होता.

पिंपळगाव-बसवंत येथील औद्योगिक वसाहतीतील पुठ्ठा फॅक्टरी परिसरात ३ नोव्हेंबर २०१५ला ही घटना घडली. मूळ बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील ही मुलगी पिंपळगावला राहत होती, या मुलीवर तिचा नातेवाईक असलेल्या श्रीकांत सिंग सुकदेव सिंग (४६) व दोन अल्पवयीन मुलांनी वारंवार अत्याचार केले. याप्रकरणी पिंपळगाव-बसवंत पोलीस ठाण्यात मुलीच्या फिर्यादीवरुन सिंगसह दोन अल्पवयीन मुलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व एस. एस. साळुंखे यांनी संशयितांविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. सिंगविरोधात निफाड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मंगळवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी श्रीकांत सिंगला दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या तपासी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी अभिनंदन करुन बक्षीस जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या