ठाण्याच्या प्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये डॉक्टरने बलात्कार केल्याचा आरोप, रुग्णाची पोलिसांत तक्रार

2702

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर डॉक्टरने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे हॉस्पिटल प्रशासनाने या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.

एका 36 वर्षीय महिलेला टीबीने ग्रासले होते. म्हणून ती ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली. तेव्हा तिची ओळख डॉ. योगेश गोडगे यांच्याशी झाली. नंतर दोघांची ओळख झाली आणि ते बाहेर भेटू लागले. डॉ. योगेश गोडगे विवाहित असताना दोघांनी 2018 मध्ये एका मंदिरात लग्न केले होते असा आरोप पीडितेने केला आहे. काही दिवसांनतर डॉ. गोडगे यांनी महिलेचा फोन उचलणे बंद केले तसेच आपले दोघांचे लग्न झालेच नाही असा पवित्राही त्यांनी घेतला असं या महिलेचे म्हणणे आहे.

डॉक्टरने 2016 आणि 2018 साली हॉस्पिटलमध्येच दोन वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे. सध्या डॉ. गोडगे बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  ज्युपिटर हॉस्पिटलच्या प्रशासनाने या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.

हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आपल्या केबिनला कधीच कडी लावत नाहीत, केबिनच्या  काचा या साऊंडप्रूफ नसल्याचेही हॉस्पीटलने सांगितले आहे.  हॉस्पिटलमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था असून इथे गर्दीही बरीच असते. यामुळे अशा प्रकारची घटना हॉस्पिटलमध्ये होणे हे अशक्य असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या