तरुणीवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीची आत्महत्या, खवड्या डोंगरावरुन उडी मारली

1445

शरणापूर परिसरात प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीने खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. तीसगाव परिसरातील रावसाहेब भाऊसाहेब माळी असे आत्महत्या करणाऱ्या संशयित मुख्य आरोपीचे नाव आहे. तरूणीवरील अत्याचार प्रकरणी पकडण्यात आलेल्या दुसऱ्या एका संशयित आरोपीने दौलताबाद ठाण्यातून पळ काढला आहे. राजू माळी असे या आरोपीचे नाव आहे.

तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रावसाहेब माळी याचा उडी मारतानाचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक पंडित यांनी घटनास्थळी धाव घेत रावसाहेब याला बेशुद्ध अवस्थेत घाटीत दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मयत रावसाहेब माळी हा शरणपूर येथील तरुणीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी होता. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दोन दिवसांपूर्वी शरणापूर परिसरातील गडावर एका प्रेमी युगुलाला तीन जणांनी अडवून मारहाण केली होती आणि मुलीवर अत्याचारही केला होता. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता.

आत्महत्या प्रकरणाचा व्हिडिओ कसा व्हायरल झाला याचीही पोलीस माहिती घेत आहे. शरणापूर परिसरातील मुलीवर अत्याचार करणाऱ्या अट्टल संशयित गुन्हेगार राजू माळी याला दौलताबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र पाऊस सुरू असताना लघुशंकेचा बहाणा करून त्याने चक्क ठाण्यातून पलायन केले. ही खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती. ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलागही केला होता. इतकंच नाही तर गावाची बदनामी झाल्याने ग्रामस्थ देखील त्याचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या