बलात्काराच्या आरोपीकडून 35 लाखांची लाच मागितली, गुजरातच्या महिला पोलिसाला अटक

2342

गुजरात येथील एका महिला पोलिसाला लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. एका बलात्कारातील आरोपीवर गुन्हा नोंदवू नये, या अटीवर ही लाच मागितली होती. श्वेता जडेजा असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, श्वेता जडेजा ही पोलीस कर्मचारी पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. श्वेताच्या विरुद्ध केनल शहा नावाच्या व्यक्तिने लाच घेतल्याची तक्रार नोंदवली आहे. केनल शहा हा एका बियाणे उत्पादन कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक असून त्याच्यावर त्याच्याच दोन महिला कर्मचाऱ्यांनी बलात्काराचा आरोप केला होता. त्यापैकी एक प्रकरण हे श्वेता काम करत असलेल्या पोलीस स्टेशनअंतर्गत येत होतं.

केनल शहाने श्वेताविरुद्ध केलेल्या तक्रारीनुसार, श्वेताने केनल याचा भाऊ भावेश याच्याशी संपर्क साधला. तिने भावेशकडे केनल याला एका विशिष्ट कलमान्वये होऊ घातलेली अटक टाळण्यासाठी 35 लाखांची लाच मागितली. मात्र, तिच्याशी वाटाघाटी करून भावेशने तिला 20 लाख इतकी लाच दिली. तिने ती एका मध्यस्थामार्फत स्वीकारल्याचा आरोप शहा बंधूंनी केला आहे.

20 लाख रुपये मिळाल्यानंतर तिने पुढील 15 लाखांसाठी या शहा बंधुंकडे धोशा लावला होता. सततच्या तिच्या मागणीला कंटाळून केनल आणि भावेश यांनी तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. या प्रकरणी श्वेता जडेजा हिला अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या