मुलाने विचारलं माझे बाबा कोण आहेत ? आईने 27 वर्षानंतर दाखल केली बलात्काराची तक्रार

27 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. या महिलेने तक्रारीत म्हटलंय की तिच्यावर दोन जणांनी बलात्कार केला होता. जेव्हा तिच्यावर बलात्कार झाला होता तेव्हा तिचं वय 12 वर्षे इतकं होतं. या महिलेच्या मुलाने अचानक तिला प्रश्न विचारला की माझे वडील कोण आहेत ? यानंतर तिने थेट पोलीस स्टेशन गाठत दोघांविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली

27 वर्षांपूर्वी ही महिला तिची बहीण आणि भावोजीसोबत उत्तर प्रदेशातील उधमपूर भागात राहात होती. घरी कोणी नसताना नकी हसन नावाची एक व्यक्ती त्यांच्या घरात घुसली आणि तिने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर काही दिवसांनी त्याचा भाऊ गुड्डू यानेही आपल्यावर बलात्कार केला असं पीडितेचं म्हणणं आहे. या दोघांनी वारंवार आपल्यावर बलात्कार केल्याचं तिने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. या बलात्कारामुळे 13 वर्षांची असताना ती गर्भवती झाली होती. 1994 साली तिने एका मुलाला जन्म दिला होता. समाजात बदनामी होऊ नये म्हणून हे मूल उधमपूरमधल्या एका ओळखीच्या व्यक्तीला देण्यात आलं होतं.

हा प्रकार घडल्यानंतर तिच्या भावोजींची बदली झाली, ज्यामुळे ती बहीण आणि भावोजींसोबत रामपूरला राहायला गेली होती. पीडिता वयात आल्यानंतर तिच्या भावोजींनी तिचं लग्न लावून दिलं. लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर तिच्या नवऱ्याला कळालं की तिच्यावर बलात्कार झाला होता. यामुळे नवऱ्याने या महिलेला घटस्फोट दिला होता. घटस्फोटानंतर ही महिला पुन्हा उधमपूरला आली. तिचा मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने त्याच्या आई-वडिलांबाबत विचारायला सुरुवात केली. चौकशी करत असताना त्याला त्याच्या आईचं नाव कळालं होतं. त्याने जेव्हा त्याच्या आईला म्हणजेच पीडितेला शोधून काढलं तेव्हा त्याने तिला प्रश्न विचारला की माझा बाप कोण आहे ? या प्रश्नानंतर तिने पोलिसांत बलात्काऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचं ठरवलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या