
टीव्ही आणि ट्विटरवर बोलण्यापेक्षा आपल्या कार्यालयातील पेन, पेपर घ्या आणि आजच्या आज राजीनामा लिहून पंतप्रधानांकडे न पाठवता थेट राष्ट्रपतींकडे पाठवा. राष्ट्रपती मोठय़ा मनाच्या असल्याने कोश्यारी यांचा राजीनामा लगेच स्वीकारतील. शिवाय येणारे राज्यपाल आताच्या राज्यपालांपेक्षा बरे असतील, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला.
‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’साठी राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने आमदार रोहित पवार आज कोल्हापूर दौऱयावर आले होते. यासंदर्भात बोलताना, ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’साठी राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक मतदान झाले असून, फेब्रुवारीअखेर 10 लाख मतदान होईल असा अंदाज आहे. महाविद्यालयातही हा अराजकीय प्रकल्प ऑनलाइन सुरू केला आहे. 24 हजारांहून अधिक जणांनी सल्लाही दिला आहे. यामधून तयार होणारी एक व्हिजन डॉक्युमेंट सरकारला देण्यात येणार आहे. त्यावर सरकारने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इच्छापत्र पाठविले जात आहे. यानंतर राज्यात राज्यपाल बदलाची चर्चा सुरू आहे. नवीन राज्यपाल आताच्या राज्यपालांपेक्षा बरे असतील, असेही रोहित पवार म्हणाले. अनेक निवडणुकीत भाजप पिछाडीस जात असल्याने निवडणूक होत नसल्याचा आरोपही पवार यांनी केला.