समविचारी पक्षांशी आघाडीचा मार्ग खुला

 

पुणे – केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधार्‍यांशी आपले आजिबात जुळणार नाही. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद समविचारी पक्षांशी आघाडीचा मार्ग राष्ट्रवादी काँग्रेसपुढे खुला असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. दलित आणि ओबीसींना मिळणार्‍या आरक्षण सवलतींना धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यास आपली कुठलीच हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यस्तरीय बैठक आज येथे झाली. या बैठकीत बोलताना पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपसारखा पक्ष सत्तेवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्षता मानणारा पक्ष असून, अशा पक्षांशी आपले जुळणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा ध्येय्य आणि धोरणे समविचारी असणार्‍या पक्षाशी येणार्‍या निवडणुकीत आघाडी करण्याचा पर्याय पक्षापुढे असून, स्थानिक पातळीवरही याच धोरणामध्ये आघाडीचे निर्णय घ्यावेत.
राज्यातील मराठा मोर्चाचा संदर्भ घेऊन पवार म्हणाले, मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही; परंतु कोणाचे काढून दुसर्‍याला देण्याची भूमिका मान्य केली जाणार नाही. दलित आणि ओबीसी घटकांना सध्या मिळणार्‍या सवलतींना कोठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने काळा पैसा बाहेर येईल हा दावा सपशेल फोल ठरला आहे. नोटाबंदीने फायदा तर नाहीच; परंतु नुकसानच जास्त होत आहे, अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशात दडवलेला काळा पैसा देशात आणू, असे जाहीर केले होते; परंतु तसे काही झाले नाही. आता नोटाबंदी करून काळा पैसा बाहेर काढण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही, असे निदर्शनास आणताना पवार यांनी १५ लाख ४२ हजार कोटी आकडा बाहेर आला. आणखी ३ लाख कोटी जमा व्हायचे आहेत. १ कोटी ४० लाख आणखी जमा होतील अशी अपेक्षा आहे. अंदाजे २ लाख कोटी जमा झालेलेच नाहीत. त्यामुळे काळा पैसा बाहेर निघाला का? असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे.
सहकारी बँकांची नोटाबंदीमुळे कोंडी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली. उद्योग अडचणीत आल्याने

कामगारकपात होऊन बेकारी वाढत आहे. शेतीमालाचे भाव पडले. सरकारने पर्यायी व्यवस्था उभी न केल्याने नोटाबंदीनंतर पदरात काय पडले, यापेक्षा नुकसानच जास्त झाल्याची टीका पवार यांनी केली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री जयंत पाटील, पद्मसिंह पाटील उपस्थित होते.

भाऊसाहेब भोईर यांच्यासह ७ नगरसेवक राष्ट्रवादीत
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काँग्रेसचे नेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह विद्यमान ७ नगरसेवकांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते राहुल भोसले, नगरसेवक विनोद नढे, गणेश लोंढे, गीता मंचरकर, शकुंतला बनसोडे आणि विमल काळे यांचा समावेश आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती तरी तेथील स्थानिक काँग्रेस नगरसेवकांना बरोबर घेऊन सत्तेत सहभाग दिला होता. समविचारी असल्याने त्यांचा प्रवेश स्थानिक नेत्यांशी बोलून झाला आहे, असे पक्षाचे नेते अजित पवार यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरीतील अनेकजण संपर्कात असल्याचे ते म्हणाले.

९ जानेवारीला राज्यभर आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस वतीने नोटाबंदी, शेती मालाचे घसरले भाव आणि सरकारच्या विरोधात ९ जानेवारीला राज्यभर आंदालनाची घोषणा पवार यांनी बैठकीत केली. सरकारच्या विरोधात आक्रमण आंदोलने करून जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडा, असे आवाहन पवार यांनी केले.