राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे एनटीसीवर आंदोलन!

गेल्या सहा महिन्यांपासूनचा थकीत पगार त्वरित द्या आणि तीन वर्षांपासून बंद असलेल्या एनटीसीच्या गिरण्या लवकरात लवकर सुरू करा, कामगारांचे व्हीआरएसचे 22 ते 23 कोटी रुपये त्वरित द्या अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने बॅलार्ड पिअर येथील एनटीसी कार्यालयावर आज जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. अखेर एनटीसी आधिकाऱयांनी सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, आमदार सचिन अहिर यांच्या आदेशानुसार एनटीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने एनटीसीचे महाव्यवस्थापक यांची भेट घेतली असता त्यांनी कामगारांचा थकीत पगार लवकरच दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे. सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, सुनिल बोरकर आदी यावेळी उपस्थित होते.

गिरणी कामगारांना देशोधडीला लावण्याचा डाव
यावेळी खासदार अरविंद सावंत म्हणाले, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईतील गिरणी कामगारांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे गिरणी कामगार उध्वस्त होता कामा नये. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन वर्षे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे हा प्रश्न धगधगत राहिला आहे. परंतु केंद्र सरकारचा गिरण्या बंद करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा डाव आहे. आज एनटीसीला सुमारे अडीच हजार कोटी रुपये आले आहेत. आठ महिने झाले तरीही गिरणी कामगारांना पगार दिला जात नाही आणि या गिरण्या पूर्ववत चालविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले गेले नाही. याप्रश्नी संसदेत नक्कीच आवाज उठवू.