बोंडअळीच्या अनुदानासाठी शिवसेनेचा रास्ता रोको

24

सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी

शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली होती. घोषणा करून वर्ष लोटले तरी शासनाने तीर्थपुरी, खालापुरी, खडका, रामसगाव, खापरदेव हिवरा, कोठी यासह घनसावंगी तालुक्यातील तीस ते चाळीस गावांतील शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई दिली नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

माजी उपजिल्हाप्रमुख श्रीकृष्ण बोबडे, तालुकाप्रमुख उद्धव मरकड, पंचायत समिती सदस्य रमेश बोबडे यांच्या नेतृत्वाखाली तीर्थपुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव मरकड यांनी सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी सुध्दा खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही, रबी पीक घेता आले नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून, त्याला आर्थिक मदत देऊन थोडाफार दिलासा देणे गरजेचे असताना शासनाने यावर्षीची मदत तर दूरच गेल्यावर्षीचेच जाहीर केलेले बोंडअळीचे अनुदान अद्याप दिले नसल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याने गतवर्षीचे एफआरपीचे ८१ रुपये शेतकऱ्यांना दिलेले नसल्याने आम्ही कारखान्यावर आंदोलन केले. दिवाळीच्या आधी बोंडअळीचे अनुदान शेतकऱ्यांना वाटप न झाल्यास लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार राजेश टोपे व पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या गाड्या अडवून त्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा उद्धव मरकड यांनी दिला. श्रीकृष्ण बोबडे व रमेश बोबडे यांची भाषणे झाली.

यावेळी उपतालुकाप्रमुख संभाजी उढाण, श्रीमंत खोजे, गणेश खेत्रे, भीमराव वाजे, विस्वास भालेकर, सतीश काळे, पांडुरंग जाधव, शरद वाजे, दीपक इंगळे, अशोक कोकाटे, अमोल तोतला, कल्याण बोबडे, शेख युनूस, विलास एसलोटे, नारायण भुतेकर, माऊली धांडे, कुंडलिक थुटे, किशोर गिराम, भाऊसाहेब बोबडे, प्रशांत सोनवणे, अर्जुन भोसले, सदाशिव ब्रह्मे, नयूम शेख, पांडुरंग मोटे आदींची उपस्थिती होती. आज आठवडी बाजार असल्याने एक तास करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे बाजाराला आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजने यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मंडळ अधिकारी एस. टी. साळवे यांनी निवेदन स्वीकारले.

आपली प्रतिक्रिया द्या