बाधित शेतकऱयांची फसवणूक करणारा नवीन ‘जीआर’ रद्द करा!

 

मागील वर्षी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱयांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हेक्टरी 13 हजार 600 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. परंतु, प्रत्यक्षात वाटप करताना या सरकारने शेतकऱयांची फसवणूक केली असून, यावेळी सरकारने काढलेला नवीन जीआर रद्द करा या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील खडर्य़ात शेतकऱयांनी रास्ता रोको आंदोलन केले.

‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा’मध्ये शेतमजुरांचा समावेश करावा, शेतकऱयांना आधार लिंक न करता युरिया खते उपलब्ध करून द्यावीत, करमाळा येथील कमला भवानी साखर कारखान्याकडील राहिलेले उसाचे बिल शेतकऱयांना त्वरित मिळावे, कांद्याचे जाहीर केलेले अनुदान लवकर मिळावे आदी मागण्यांसाठी शेतकऱयांनी रास्ता रोको केला. या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, पंचायत समितीचे विकास अधिकारी विकास शेळके यांनी स्वीकारले. यावेळी बोलताना कृषी अधिकारी सुपेकर म्हणाले, आपल्या मागण्या व शेतकऱयांच्या भावना आम्ही अधिकारी म्हणून सरकारकडे पोहोच करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे, मंगेश आजबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह गोलेकर, श्रीकांत लोखंडे, चंद्रकांत गोलेकर, कल्याण सुरवसे, मोहनराव लोखंडे, ऍड. ऋषिकेश डुचे, राम ढेरे, राजेंद्र गोलेकर, भीमराव लेंडे यांच्यासह खर्डा परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.