अवैद्य दारू विक्री बंदसाठी तावशी येथील महिलांचा महामार्गावर ठिय्या

188

सामना प्रतिनिधी । औसा

औसा तालुक्यातील तावशी येथे अवैद्य दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवैद्य दारू विकी बंद करावी. या मागणीसाठी महिलांसह व ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करीत वाहतूक अडविली. मागील अनेक दिवसांपासून तावशी (ता) येथे बेकायदेशीर रित्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याने संतप्त नागरिकांनी व महिलांनी नागपूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर रास्ता रोको आंदोलन केले. अवैद्य दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा ग्रामस्थ व महिलांचा आरोप आहे.

शेकडो नागरिकांसह महिलांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. भादा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी एका अवैद्य दारू विक्रेत्यास ताब्यात घेतले. परंतु गावातील इतर अवैद्य दारू विक्रेत्यांना ताब्यात घेवून गावातील बेकायदा दारूविक्री बंद करावी, या मागणीसाठी संतप्त महिला व नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याने गदारोळ निर्माण झाला होता. औसा तालुक्यात अनेक गावात मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्या दारूची विक्री होत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी बोरफळ येथील महिलांनीही बेकायदा दारूविक्री बंद करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यासाठी आंदोलन छेडले होते. अवैद्य दारू विक्रीच्या विरोधात महिला आक्रमक होत असून अवैद्य धंद्याला आवर घालावा अशी मागणी ग्रामस्थ व महिला करीत आहेत. तावशी (ताड) येथे राष्ट्रीय महामार्गावर महिलांनी गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी रास्ता रोको केल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या