हिंदुस्थानातील उद्योग महर्षी रतन टाटा यांनी बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशावर शोककळा पसरली. राजकीय, मनोरंजन, क्रीडाविश्वासह सर्व क्षेत्रातून रतन टाटा यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे. रतन टाटा यांचे हिंदुस्थानी क्रिकेटच्या विकासात देखील महत्वाचे योगदान आहे. अनेक दिग्गज खेळाडू रतन टाटा यांच्या संघासाठी क्रिकेट खेळले आहेत.
रतन टाटा यांच्या काळात टाटा समूहाच्या विविध कंपन्यांनी अनेक हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना पाठिंबा दिला. आर्थिक मदतीसाठी खेळाडूंना नोकर्या दिल्या. टाटा समूहाच्या एअर इंडियाने १९९३ च्या जगज्जेत्या हिंदुस्थानी संघातील मोहिंदर अमरनाथला खूप पाठिंबा दिला. मेहंदरला एअर इंडियाकडून पगार मिळत असे. याशिवाय फारुख इंजिनियर टाटा मोटर्ससाठी क्रिकेट खेळायचे.
टाटा समूहाने संजय मांजरेकर, रॉबिन उथप्पा, जवागल श्रीनाथ, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ या दिग्गज खेळाडूंनाही पाठिंबा दिला. हे सर्व खेळाडू टाटा इकोसिस्टमचा भाग होते. टाटा स्टीलने टीम इंडियाचे विद्यमान मुख्य निवडकर्ता अजित आगरकरलाही खूप मदत केली. २००७ मध्ये टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. या संघात अजित आगरकर देखील होता. सध्या खेळत असलेला शार्दुल ठाकूर (टाटा पॉवर) व जयंत यादव (एअर इंडिया) यांनीही टाटा समूहाने खूप पाठिंबा दिला आहे.
खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली
क्रीडाविश्वातून सचिन तेंडुलकर रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन, इरफान पठाण, सुरेश रैना, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, युसुफ पठाण, ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा यांनी ट्विट करत सोशल मीडियाद्वारे रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.