ऐन दिवाळीच्या तोंडावर देशात महागाईचा भडका उडाला असून, नऊ महिन्यातील उच्चांक गाठला आहे. अन्नधान्य, भाज्या, फळे, दुधाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या डेटानुसार सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्ट महिन्यात हा दर 3.65 टक्के होता. गेल्या नऊ महिन्यातील महागाईचा हा उच्चांकी दर आहे.
खराब हवामान, जोरदार पाऊस यामुळे किरकोळ महागाई 5.49 टक्क्यांवर गेल्याचे सांगण्यात येते. विशेषतः भाज्यांचा महागाईचा दर 11 टक्क्यांवरून 36 टक्क्यांवर गेला. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये भाज्या तिप्पटीने महागल्या. ऑगस्टमध्ये अन्नधान्य महागाईचा दर 5.66 टक्के होता. तो दर आता 9.24 टक्क्यांवर गेला आहे. फळे 6.45 टक्क्यांवरून 7.65 टक्के, दुध 2.98 टक्क्यावरून 3.03 टक्क्यांपर्यंत महागले आहे. महागाईचा दर ग्रामीण भागात 5.87 टक्के तर शहरी भागात 5.05 टक्के आहे. राज्यांचा विचार केल्यास बिहारमध्ये सर्वाधिक 7.5 टक्के तर सर्वात कमी दिल्लीत 3.67 टक्के महागाई आहे.