हिंदुस्थानात बेरोजगारी वाढणार!

71

सामना ऑनलाईन,न्यूयॉर्क

नोटाबंदीमुळे देशातील अर्थव्यवस्था मंदावली असताना आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने बेरोजगारी वाढण्याचा इशारा दिला आहे. संघटनेने ‘आंतरराष्ट्रीय रोजगार आणि सामाजिक दृष्टीकोन’ हा २०१७ सालातील रोजगारासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी केंद्राने नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देशातील अर्थगाडा संथ झाला आहे. लघु, मध्यम  उद्योग अडचणीत आल्याने १५ लाख कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. देशातील रोजगार परिस्थिती २०१७ सालातही निराशाजनक राहणार आहे. भविष्यातील रोजगाराचा आढावा घेणारा ‘आंतरराष्ट्रीय रोजगार आणि सामाजिक दृष्टीकोन’ हा अहवाल आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने जारी केला आहे. रोजगाराची वाढती गरज बघता आर्थिक विकास मात्र मंदावलेला राहणार आहे. २०१७ सालात रोजगार कमी होण्याबरोबरच सामाजिक विषमतेत वाढ होण्याचा अंदाज संघटनेने व्यक्त केला आहे. २०१७-२०१८ मध्ये हिंदुस्थानात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी आवश्यक काम होताना दिसत नाही. त्यामुळे याच कालावधीत रोजगारात कपात होणार आहे. २०१६ सालात देशातील बेरोजगारांची संख्या १.७७ कोटी, २०१७ सालात १.७८ कोटी होणार असून २०१८ मध्ये १.८ कोटी हेऊ शकते अशी शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या