उमेदवारांना खर्चासाठी महापालिकेचे रेटकार्ड

सामना ऑनलाईन, ठाणे

अर्धा लिटर पाण्याची बाटली 10 रुपये, चिकन बिर्याणी 80 रुपये, दोन वडापाव 18 रुपये, गांधी टोपी 2 रुपये, मफलर 15 रुपये, झेंडा 10 ते 30 रुपये, बुके 170 ते 900 रुपये, पुष्पहार 300 ते 1050,  प्रचारकाचा भत्ता 423 रुपये. हे कोणत्या हॉटेलचे मेन्यूकार्ड किंवा एखाद्या दुकानाबाहेर लावलेली दरसूची नसून निवडणूक लढवणाऱया उमेदवारासाठी महापालिकेने दिलेले हे खर्चाचे रेटकार्ड आहे. अगदी खोडरब्बरपासून ते मतमोजणीच्या प्रतिनिधीच्या भत्त्यापर्यंत  प्रत्येक खर्च पालिकेने दिलेल्या रेटकार्डनुसारच करावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाने यंदा उमेदवारांसाठी असलेल्या खर्चाची मर्यादा वाढवून आता आठ लाख एवढी केली आहे. त्यातच चार पॅनलचा एक प्रभाग झाल्याने प्रत्येक प्रभागात एका पक्षाचे किमान चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. म्हणजे एका प्रभागात उमेदवारांना एकूण 32 लाख इतका खर्च करता येता आहे, पण याचा अर्थ निवडणुकीत उमेदवारांना सढळ हस्ते खर्च करता येणार असे नाही. निवडणूक साहित्यापासून ते प्रचार सभांपर्यंत होणाऱया खर्चाची लिस्ट महापालिकेने तयार केली असून त्याचे दरही ठरवले आहे. त्या दरानुसारच वस्तूंची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर प्रचारकांचा भत्ता ते मतमोजणी करणाऱया प्रतिनिधीचाही भत्ता ठरवून देण्यात आला आहे. वाहनांच्या संख्येवरही मर्यादा आणण्यात आली आहे.

 महापालिकेची कमाई

प्रचारासाठी उमेदवारांचे पैसे खर्च होणार असले तरी महापालिकेच्या तिजोरीत मात्र यानिमित्ताने भर पडत आहे. शहरात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे मोठमोठे होर्डिंग व बॅनर लागले असून त्यासाठी महापालिका प्रति चौरसमीटर 300 ते 260  मासिक दर आकारत आहे. दिव्यावरील खांबांच्या फलकासाठी प्रति इंच 230 मासिक दर घेण्यात येत आहे. तर बसथांब्यावरील जाहिरातीसाठी प्रति चौरस मीटर 340 रुपये आणि वाहनांवरील जाहिरातीसाठी 250 रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे.

 मेन्यूकार्ड

प्रचारात सर्वाधिक खर्च होतो तो कार्यकर्ते व प्रचारकांवर. त्याच्या खाण्यापिण्यापासून ते त्यांना टोपी, टी-शर्ट पुरवण्यापर्यंत सर्व साहित्यासाठी पुढील दर निश्चित करण्यात आले आहेत.

चहा – 10 रुपये, थंडा – 13 रुपये, वडापाव – 9 रुपये, शिरा, उपमा, मिसळपाव- 30 रुपये, राइस प्लेट- 70 रुपये, व्हेज बिर्याणी- 70 रुपये, चिकन बिर्याणी- 80 रुपये अशा सुमारे 47 खाद्यपदार्थांच्या दराचे मेन्यूकार्ड  देण्यात आले आहे.

फुलांची माळ ते फटाक्यांच्या माळा

प्रचार फेऱया आणि सभांसाठी लागणाऱया पुष्पहारांच्या किमतीसह फटाक्यांच्या माळांपर्यंचे दरही ठरवून दिले आहेत. त्यानुसार सहा फुटाच्या पुष्पहारासाठी 300 रुपये तर व्हीआयपी  पुष्पहारासाठी 1050 रुपयांपर्यंच खर्च करता येणार आहे. फुलांच्या तुऱयासाठी 30 रुपये तर बुकेसाठी 170 ते 900 रुपयांपर्यंत दर ठरवण्यात आले आहेत. तर फटाक्यांच्या हजाराच्या माळेसाठी 130 रुपये आणि दहाहजारी माळेसाठी दीड हजार रुपये खर्च करावा लागणार आहे.

प्रत्येक प्रभागात कोटय़वधीची उलाढाल

प्रत्येक प्रभागात किमान 19 तर जास्तीतजास्त 39 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रत्येक उमेदवार 8 लाख रुपये खर्च करणार असेल तर एका प्रभागात किमान 1 कोटी 16 लाख रुपयांची किमान उलाढाल होणार आहे. हा आकडा उमेदवारांच्या संख्येनुसार वाढत जाणार असल्याने यंदाची निवडणुकीत अब्जावधी रुपयांचा चुराडा होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या