शालेय पोषण आहार योजनेतील तांदळाचा काळाबाजार,पती-पत्नीसह दुकान मालकाला अटक

754

विक्रोळीच्या पार्कसाईट येथे राज्य शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शासकीय अनुदानामध्ये पुरविलेल्या एक हजार 187 किलो तांदळाचा काळाबाजार करणाऱया एक संस्थेच्या अध्यक्ष महिलेसह तिचा पती तसेच या गुह्यात सहभागी असलेल्या दुकानदाराला गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने बेडय़ा ठोकल्या आहेत.

विक्रोळी येथील एक दुकानदार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणारा तांदूळ काळ्या बाजाराने खरेदी करून तो बेकायदेशीरपणे विकत असल्याचा गुन्हा पार्कसाईट पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याची गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने गुह्याचा समांतर तपास सुरू केला. प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर, एपीआय महेंद्र दोरकर, कॉन्स्टेबल संतोष गुरव, गोविंद गवारी, संतोष धुमाळ हे पथक गुह्याचा शोध घेत असताना पार्कसाईट येथील हनुमान नगरात असलेल्या अंबिका धान्य दुकानाचा मालक चिंतन गुसाई (24) हा या गुह्यात सहभागी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने दुकानावर छापा टाकून राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शासकीय अनुदानाद्वारे पुरविलेल्या एकूण 24 गोण्यांमध्ये 1187.5 किलो तांदळाचा साठा मिळाला. तेव्हा हा तांदळाचा साठा श्रेया औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱयांकडून खरेदी केल्याचे दुकान मालकाने सांगितले.

पती-पत्नीने केला तांदळाचा झोल
दुकान मालक चिंतन याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रेया औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेच्या अध्यक्षा संगीता पानसकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत त्यांचे पती चंद्रकांत पानसकर हे संगनमताने शासकीय अनुदानातून आलेला तांदळाचा साठा काळाबाजारात अंबिका दुकानदाराला विकायचे असे स्पष्ट झाले.

आपली प्रतिक्रिया द्या