स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा 12 डिसेंबर रोजी मोर्चा; पंतप्रधान नरेंद्र मोंदींचे बंधू मोर्चाचे नेतृत्व करणार

रेशन बचाव समिती, महाराष्ट्र व बुलढाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 12 डिसेंबर रोजी शेतकरी लाभार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधु प्रल्हाद मोदी बुलढाण्यात करणार आहे.

महाराष्ट्र राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना विदर्भ व मराठवाड्यातील अवर्षण-प्रवण व शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील 39 लाख 97000 लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा कायद्यातील तरतूदीप्रमाणे सवलतीच्या दरात धान्य देण्याची योजना सुरू करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील 3 लाख 72000 लाभार्थी यात समाविष्ट आहेत. 1 जुलै 2022 पासून या योजनेतील लाभार्थ्यांचे प्रथम गव्हाचे वाटप बंद करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या लाभार्थ्यांचे तांदूळाचे वाटप बंद करण्यात आले असून नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या नियतनामध्ये कोणत्याच प्रकारचे धान्य या लाभार्थ्यांना देण्यात आलेले नाही. या लाभार्थ्यांचा रोष सहाजिकच गावातील स्वस्त धान्य दुकानदारांवर राहून स्वस्त धान्य दुकानदारांशी ते वादविवाद करू लागल्याने जिल्हा संघटनेकडून व राज्य संघटनेकडून या लाभार्थ्यांना धान्य मिळण्याबाबत वारंवार निवेदने लोकप्रतिनिधींसह तहसिल स्तरापासून मंत्रालय स्तरापर्यंत देवूनही कोणीही दखल न घेतल्याने रेशन बचाव समिती महाराष्ट्र व जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधरक संघटना यांच्या वतीने जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांना सोबत घेऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांची केंद्रीय स्तरावरील कार्यकारीणीची व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, राज्याध्यक्ष व संघटनेचे पदाधिकारी यांची बैठकही 12 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे राधागोविंद सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित केली आहे. यामध्ये राज्य स्तरावरील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडीअडचणी, समस्या, मागण्या यावर विचारविनिमय होवून नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.

योगायोगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू राष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी, जनरल सेक्रेटरी विश्वंभर बसू, ओंकारनाथ झा, राज्य संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील, जनरल सेक्रेटरी कॉ. चंद्रकांत यादव, विजयकुमार पंडीत, अन्य राज्यातील पदाधिकारी, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहून मोर्चात सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकरी लाभार्थी, ऑनलाईन झालेले धान्य मिळत नसलेले केशरी शिधापत्रिकाधारक व धान्याचा लाभ मिळत नसलेले दिव्यांग व्यक्तींनी या मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेश अंबुसकर, जिल्हा सचिव मोहन जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विश्वास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बरडे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.