रत्नागिरीत भोस्ते घाटात टॅकर दरीत कोसळला, चालक जखमी

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात भरधाव वेगातील टँकर सुमारे 40 फुट खोल दरीत कोसळून अपघात झाला. चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून तो या जीवघेण्या अपघातातून केवळ जखमी होण्यावर बचावला. हा अपघात शुक्रवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास घडला. हा टँकर बँगलोर येथून महाड औद्योगिक वसाहतीकडे चालला होता.

वाहतुक शाखेची सहाय्यक पोलीस निरिक्षक बोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार टँकर चालक चंद्रप्रकाश आनंदकुमार श्रीवास्तव हा आपल्या ताब्यातील टँकर बंगलोर येथून घेऊन महाड येथे चालला होता. शुक्रवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास तो भोस्ते घाट उतरत असताना चालक श्रीवास्तव याचा टँकरवरील ताबा सुटला आणि एका वळणावर रस्त्याच्या कडेचा सुरक्षा कटडा तोडून तो टँकर सुमारे 40 फुट खोल दरीत कोसळला. अपघाताची खबर मिळताच मृत्युंजय टीमचे कॅप्टन प्रसाद गांधी व त्यांचे सहकारी रोहन इनरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. टँकरच्या केबीनमध्ये जखमी अवस्थेत अडकून पडलेला चालक श्रीवास्तव हा वाचविण्यासाठी याचना करत होता.

प्रसाद गांधी व त्याचा सहकारी इनरकर यांनी त्याला केबीनमधून बाहेर काढून कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णलयात उपचारांसाठी दाखल केले. दरम्यान कशेडी वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बोडकर, सुर्वे, चिकणे, दाभोळकर, दुर्गावळे, खेड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत गडदे, भुषण सावंत, अडकुळ, घटनास्थळी दाखल होवून मदत कार्यास सुरवात केली.

आपली प्रतिक्रिया द्या