राज्यात रत्नागिरी जिल्हा कुठे आहे? ते मला पहायचंय! नूतन जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांचे सूचक वक्तव्य

सोमवारपासून मी विविध विभागांच्या बैठका घेणार आहे. या बैठकांमधून प्रत्येक विभागाचा मी आढावा घेईन. आयुष्मान भारत ही केंद्रसरकारची योजना आहे, त्या योजनेच्या अंमलबजावणीबाबतही माहिती घेणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा कोठे आहे? याचा आढावा घेणार असल्याचे रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. देवेंदर सिंग यांनी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. रत्नागिरी जिल्हाधिकारी पदी देवेंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. देवेंदर सिंग शुक्रवारी संध्याकाळी रत्नागिरीत दाखल झाले. आज त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. सुरुवातीला त्यांनी आपला परिचय करून दिला. देवेंदर सिंग यांनी यापूर्वी बीड आणि यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पद भूषविले आहे. लातूर महानगरपालिकेत ते आयुक्तही होते. गेली 11 वर्षे त्यांची सेवा झाली असून ते एमबीए आहेत. कॉम्प्युटर सायन्समध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे. यापूर्वी पुणे येथे एमएसआरटीमध्ये ते संचालक म्हणून कार्यरत होते.

नैसर्गिक आपत्तीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करु

जिल्हाधिकारी देवेंदर सिंग म्हणाले की, आज पहिल्या दिवशी मी जिल्ह्यातील काही महत्वाच्या गोष्टींबाबत माहिती घेतली. त्यामध्ये या जिल्ह्यात पायाभूत प्रकल्प उभारणे महत्वाचे आहे. रत्नागिरीतील विमानतळाच्या टर्मिनलचे काम बाकी आहे. त्याचबरोबर मेडिकल कॉलेजही सुरु करायचे असून यंदाच्या वर्षापासून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरु करायची आहे. या जिल्ह्याला गेल्या दोनतीन वर्षात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही. मात्र नैसर्गिक आपत्तीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करू. त्याकरीता वृक्षलागवडीची मोहीम राबवू. प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करु, असे जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी सांगितले.