रत्नागिरी – विवाह संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल बनवून फसवणारा पोलिसांच्या जाळ्यात

लग्न जुळविण्याच्या संकेतस्थळावर बनावट प्रोफाईल बनवून फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीच्या नावाने बनावट प्रोफाईल बनवून एका तरूणाला 77 हजार रूपयांना लुटले होते.

खेड येथील एका तरूणाने शादी डॉट कॉमवर लग्न जुळण्यासाठी नोंदणी केली. त्याला समोरून एका सुंदर मुलीचा होकार आला .काही दिवसात त्या सुंदर मुलीने व्हॉटसॲपवर आणखी काही आपले फोटो पाठवत संवाद वाढवला. पुढे काही दिवसांनी आपले आई-वडील आजारी आहेत असे सांगून त्या तरूणाकडे पैशाची मागणी केली.

ही सुंदर तरूणी आपल्या सोबत लग्न करणार या आनंदात त्या तरूणाने तिला 77 हजार रूपये पाठवले. त्यानंतर दिलेले पैसे मागताच त्या तरूणाचा मोबाईल ब्लॉक करण्यात आला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्या तरूणाच्या लक्षात आले. त्याने पोलीस खेड ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस निरीक्षक यांनी एक पथक तयार करून शोध घेतला.

मनोज छोटूराम योगी (वय – 41, रा. लोंढा हेवंस डोंबिवली वेस्ट) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडील दोन मोबाईल आणि एक चारचाकी गाडी जप्त केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरीक्षक सुजीत सोनावणे, अजय कडू, वैभव ओहळ, श्रध्दा पवार, शबाना मुल्ला आणि रमीझ शेख यांनी केली.