Ratnagiri crime news – रेल्वेत चोऱ्या करणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या ताब्यात

रेल्वे प्रवासादरम्याने चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे. दिनेश कुमार ओमप्रकाश असे 27 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. त्याला गोव्यातील मडगाव येथून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 12 जूनला 15 हजार 499, तर 30 जून रोजी 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी रेल्वे प्रवासा दरम्यान घडलेल्या सर्व चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला व सर्व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. या सूचनांच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत समांतर तपास सुरू करण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि त्याला गोव्यातील मडगाव येथून अटक केली. दिनेश कुमार ओमप्रकाश असे आरोपीचे नाव असून दोन्ही गुन्हे आपणच केल्याची कबुली त्याने पोलीस चौकशीदरम्यान दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 39200 रुपये किंमतीचे 4 मोबाईल जप्त केले आहेत. तसेच गुन्ह्यातील 100 टक्के मुद्देमालही हस्तगत केला आहे. तसेच आरोपीने रेल्वे प्रवासा दरम्यान आणखी चोरीचे गुन्हे केले आहेत का? याचा अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अमोल गोरे, पोहवा विजय आंबेकर,पोहवा सागर साळवी, पोहवा योगेश नार्वेकर, पोना दत्तात्रय कांबळे व पोकॉ अतुल कांबळे यांनी केली.

‘रत्नागिरी मधील नागरिकांनी रेल्वे प्रवासा दरम्याने आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवण्याची योग्य खबरदारी घ्यावी व अश्या प्रकारचे गुन्हे आपल्या आजूबाजूला घडत असतील तर तात्काळ 112 या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा.’

धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.