रत्नागिरीच्या सायबर सेलने वाचवला नैराश्यग्रस्त तरुणाचा जीव

ऑनलाईन फसवणुकीमध्ये बहिणीच्या लग्नासाठी साठविलेले लाखभर रूपये गमावल्याच्या नैराश्यामधून एका तरूणाने जीव देत असल्याचा विचार सुसाईड हेल्पलाईनला बोलून दाखविला…तरूणाने आत्महत्या करतो असे सांगताच मुंबई सायबर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्या तरुणाचा खेड पोलिसांच्या मदतीने जीव वाचवला.

माझी आर्थिक फसवणूक झाली, मी आत्महत्या करतोय असा हा फोन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे रत्नागिरी पोलिसांशी संपर्क केला. काही क्षणातच रत्नागिरी पोलिसांच्या अधिपृत ट्विटर हँडलवरून त्याला प्रतिसाद मिळाला. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व निरीक्षक शिरिष सासणे यांनी रत्नागिरी पोलिसांच्या सायबर सेलला अलर्ट केले. या तरुणाचे लोकेशन पोलीस नाईक शेख यांनी दिले. त्यानंतर सायबर सेलचे पोलीस नाईक गमरे हे फोनवरून त्या युवकाचे समुपदेशन करत होते त्याचवेळी खेड पोलीस त्या युवकांच्या घरी पोहोचले.

या युवकाची 1 लाखाची ऑनलाईन फसवणूक झाली होती. ते पैसे त्याने बहिणीच्या लग्नासाठी ठेवले होते. मात्र फसवणूक झाल्यानंतर तो निराश झाला होता आणि त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. मात्र रत्नागिरी पोलिसांचा सोशल मीडिया, सायबर सेल, खेड पोलीस यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एका युवकाचा जीव वाचला.

आपली प्रतिक्रिया द्या