रत्नागिरीत दाभोळेनजिक दोन ट्रकचा अपघात, एकजण गंभीर

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर दाभोळे घाटामध्ये दोन ट्रकची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घाटातील मालप वाडी जवळ असणाऱ्या अवघड वळणावर हा अपघात घडला.

जयगड येथून साताऱ्याच्या दिशेने जाणारा ट्रक MH-11-CH-6780 आणि कोल्हापूर वरून रत्नागिरी च्या दिशेने जाणारा आयशर MH 09 BC 166 यांची समोरासमोर धडक बसून आयशर चालक संभाजी गोसावी (45) कोल्हापूर हे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे आणण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.

अवघड वळणाचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडला. तसेच ट्रक चालक गणेश गोळे (33) हे ह्या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साखरपा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची बातमी मिळताच पी एस आय विद्या पाटील यांनी घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन दोन्ही वाहने जे सी बी च्या साहाय्याने बाजूला करून घटनेचा पंचनामा केला व खोळंबलेली वाहतुक पूर्वरत आणली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस नाईक अर्पिता दुधाणे, हेमा गोतावडे, कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर, वैभव कांबळे, वैभव नटे आदी कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनेचा अधिक तपास साखरपा पोलीस दुर्क्षेत्रकडून सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या