जुगाराच्या कारवाईची सखोल चौकशी करणार – रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग

रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीची आम्ही गांभिर्याने चौकशी करत आहोत. मधल्या काळात जिल्ह्यात घडलेल्या 3 मोठ्या गुन्ह्यांमुळे आम्हाला त्या प्रकरणाकडे थोडे लक्ष देता आले नाही. पण आम्ही पुन्हा त्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. या संदर्भातील सर्व माहिती आम्ही गोळा करत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले.

गणेशोत्सवात मुरुगवाडा येथील एका बंगल्यामध्ये सुरु असलेल्या जुगारावर रत्नागिरी शहर पोलीसांनी धाड टाकली. या कारवाईमध्ये तेराजणांवर गुन्हा दाखल करत 44 हजार रुपये जप्त केले. जप्त केलेली रक्कम पाहता अनेक शंका निर्माण झाल्या आणि कारवाईबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली. याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी घेतली आणि या संपूर्ण कारवाईची त्यांनी चौकशी सुरु करताना जुगारातील म्होरक्यालाही आरोपी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही म्होरक्यावर गुन्हा दाखल झालेला नाही.
त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग म्हणाले की, मधल्या काळात एटीएम चोरी आणि त्यानंतर दोन खुनांच्या घटना रत्नागिरीत घडल्या. या प्रकरणांमुळे जुगाराच्या कारवाईच्या तपासाकडे थोडे दुर्लक्ष झाले असले तरी आम्ही त्याची सखोल चौकशी करत आहोत. त्याबाबतची आणखी माहिती आम्ही घेत आहोत. काही कर्मचाऱ्यांबददलही तक्रारी आल्या असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले.

जुगाराची ती खोली मालकाची की भाड्याची?

ज्या खोलीमध्ये जुगार सुरु होता ती खोली ज्या मालकाची होती त्या मालकावरही गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. मात्र ती खोली भाड्याने दिली होती का? असा विषयही चर्चेला येत आहे. ती खोली जर भाड्याने दिली असेल तर तिचा भाडेकरार कधी झाला? आतापर्यंत कितीवेळा भाडे भरले गेले? या सर्व गोष्टींचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.