रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणूक, छाननीमध्ये 9 अर्ज अवैध, 46 जागांसाठी 116 उमेदवार रिंगणात

रत्नागिरी तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली. छाननीअंती सरपंच पदाच्या 11 उमेदवारी अर्जांपैकी सर्वच अर्ज वैध ठरले आहेत. सदस्य पदासाठी आलेल्या 125 अर्जांपैकी 9 अर्ज अवैध ठरले आहेत. 116 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील चरवेली, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि शिरगाव या चार ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. थेट सरपंच पदासाठी एकूण 11 अर्ज आले होते. त्यामध्ये चरवेली ग्रामपंचायतीमध्ये एक, फणसोपमध्ये 2, पोमेडी बुद्रुक आणि शिरगावमध्ये प्रत्येकी 4 उमेदवारी अर्ज आले होते. हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. आता 4 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या चारही ग्रामपंचायतींमध्ये मिळून 46 जागांसाठी 125 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी 9 अर्ज अवैध ठरले आहेत. चरवेली ग्रामपंचायतीमध्ये 7 जागांसाठी 8 अर्ज आले. हे सर्व अर्ज वैध ठरले. फणसोप ग्रामपंचायतीमध्ये 11 जागांसाठी 28 अर्ज आले. यापैकी 2 अर्ज अवैध ठरले. उर्वरित 26 अर्ज वैध ठरले आहेत. पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 37 अर्ज आले. हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी 52 अर्ज आले होते. त्यापैकी 7 अर्ज अवैध ठरले. 45 अर्ज वैध ठरले आहेत.