रत्नागिरीत हिंदू नववर्ष स्वागतयात्रा निघणार, सलग 19व्या वर्षी आयोजन

रत्नागिरी येथे 19व्या वर्षी येथे हिंदू नववर्ष गुढीपाडवा स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. ग्राममंदिर श्री देव भैरी मंदिर ते समाजमंदिर श्री पतितपावन मंदिरापर्यंत निघणाऱ्या या यात्रेत 70 पेक्षा जास्त चित्ररथ सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशभूषेत हजारो हिंदू बंधू-भगिनी या स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेच्या संदर्भातील बैठका झाल्या असून रविवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या दुचाकी व सायकल फेरीला उदंड प्रतिसाद लाभला. जय भवानी जय शिवाजी, भारतमाता की जय, सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. शहर परिसरात सुमारे पंधरा किलोमीटरच्या या फेरीने वातावरण भगवेमय केले.

येत्या गुढीपाडव्याला दि.22 मार्च रोजी ही स्वागतयात्रा पारंपरिक वेशभूषेत आणि उत्साही वातावरणात काढण्यात येणार आहे. झाडगाव येथील भैरी मंदिर येथे गुढी उभी केल्यानंतर व गाऱ्हाणे झाल्यानंतर यात्रेला प्रारंभ होईल. ही स्वागतयात्रा कॉंग्रेसभवन, गोखले नाकामार्गे जयस्तंभ येथे येईल. येथे ही यात्रा आणि मारुती मंदिरपासून निघालेली स्वागतयात्रा एकत्र होऊन विराट संख्येने राम आळी मार्गे, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात पोहोचणार आहे. या मंदिरात हिंदु धर्माची शपथ घेऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. यंदा मारुती मंदिर व वरच्या भागातूनही 35 चित्ररथ सहभागी होणार आहेत.

महिलांसाठी गुढीपाडवा तारका स्पर्धा

हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत महिला, युवतींसाठी गुढीपाडवा तारका पारंपरिक वेशभूषा ही अनोखी स्पर्धा यंदा प्रथमच आयोजित केली आहे. याअंतर्गत 5 जणींचा पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ही संकल्पना व आयोजक कांचन डिजिटल फोटो स्टुडिओने आणली आहे. याकरिता गणेश वस्त्र निकेतनचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या, विशेष साजशृंगार केलेल्या पाच महिला, युवतींना बक्षीस स्वरूपात खास पैठणी मिळणार आहे. पारितोषिक प्राप्त करण्यासाठी पारंपरिक साज लेऊन महिला किंवा युवतींनी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सक्रिय सहभागी होणे आवश्यक आहे. संपूर्ण शोभायात्रेत सहभाग असणे आवश्यक असून परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वागतयात्रेची वैशिष्ट्ये

70 हून अधिक चित्ररथ सहभागी होणार, यात्रेत शौर्य खेळ प्रात्यक्षिके, दांडपट्टा, लाठी-काठी प्रात्यक्षिके, अघोरी लीला, शिवतांडव नृत्य सादर होणार आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबही यंदा प्रथमच सहभागी होणार आहे. क्लबचा रथ असून त्यामध्ये विविध प्रकारच्या सायकली पाहता येतील व सायकलिस्ट पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. पांढरा समुद्र ते मिऱ्या या भागातील सर्वच समाज बांधव स्वागतयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मिऱ्या येथील महिला भगिनी पारंपरिक वेषात, साज शृंगार करून ढोल ताशांच्या गजरात सहभागी होतील.