खेडमध्ये कोरोनाची दहशत; वर्षभरात 3320 जणांचा कोरोनाची लागण, 122 जणांचा मृत्यू

रत्नागिरीतील खेड तालुक्यात  कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात 3320 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 122 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र नागरिकांनाच कोरोनाचे गांभिर्य नसल्यामुळे कोरोना आटोक्यात येण्याऐवजी कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

मार्च 2020 च्या शेवटच्या आठवड्यात खेडमध्ये कोरोनाचे काही संशयित रुग्ण आढळून आले. हे सारे नेपाळ येथे पिकनिकला गेले होते. त्यांचे स्वब घेऊन ते तपासणी लॅबमध्ये पाठवण्यात आले. सुदैवाने सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.. त्यानंतर एप्रिलमध्ये खेडमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला. 8 एप्रिल 2020 रोजी त्या रुग्णाचा  कळंबणी रुग्णालयात मृत्यू झाला आणि हा मृत्यू जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला मृत्यू ठरला.

त्यानंतर खेडमध्ये कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली. अनेकांना कोरोनाने गाठले, ज्याना कोरोनावर वेळेत उपचार मिळाले ते वाचले मात्र ज्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत त्यांना मृत्यूने गाठले.

मार्च 2020 च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झालेल्या या महामारीने काही महिने अगदी उच्छाद मांडला होता मात्र यातून मार्ग कसा काढायचा हे कुणालाच कळत नव्हते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत होते. अखेर प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले आणि हळुहळु कोरोना आटोक्यात येऊ लागला. जानेवारी 2021 मध्ये खेडमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात खेड तालुका जवळ-जवळ कोरोनामुक्त झाला.

कोरोना आटोक्यात आल्याने प्रशासनानाला हायसे वाटले, दरम्यान लॉकडाऊनचे निर्बध शिथिल झाले आणि सुमारे 11 महिने कोरोना महामारीमुळे ठप्प झालेले व्यवहार हळुहळु सुरळीत होवू लागले.मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

9 फेब्रुवारी 2021 हा दिवस खेड तालुक्यासाठी अतिशय वेदनादायी बातमी घेऊन आला. या दिवशी तालुक्यातील आंबवली परिसरातील एका गावात एकाच दिवशी 9 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले. आणि कोरोनाने ग्रामीण भागात हातपाय पसरायला सुरुवात केली. 9 फेब्रुवारी रोजी सुरु झालेलारुग्णवाढीचा सिलसिला आजतागायत सुरुच आहे.

आरोग्य विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत तालुक्यात 3320 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यातील अनेकांनी कोरोनावर मात केली असली तरी 122 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत तालुक्यात 398 अॅक्टिव रुग्ण असून बेडची उपलब्धता नसल्याने त्यापैकी 218 जण होम आयशोलनमध्ये आहे. सद्यस्थितीत खेडमध्ये प्रतिदिनी तीन ते चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या