ग्रामपंचायतीत जास्त दराने क्रीडासाहित्याची खरेदी, भाजपच्या सरपंचावर दहा सदस्यांचा आरोप

रत्नागिरीतील कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या 2019-20 या वर्षात क्रीडा साहित्य पुरवठा व्यवहारात आर्थिक अपहार झाल्याचा आरोप कुवारबाव उपसरपंचांसह दहा सदस्यांनी केला आहे.

खरेदी केलेल्या क्रीडा साहित्यांच्या सामानाची एमआरपी आणि बिलावरची रक्कम यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने ग्रामपंचायतीमधील सदस्य आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाची आणि सरपंच व ग्रामसेवकाची चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

कुवारबाव ग्रामपंचायतीच्या भाजपच्या सरपंच मंजिरी पाडळकर यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याचबरोबर ग्रामसेवकही चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. चौदाव्या वित्त आयोगातील खरेदी केलेल्या क्रीडा साहित्याच्या अवाजवी किंमती लावण्यात आल्या. क्रीडा साहित्याची बाजारातील किंमत आणि ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या साहित्याची किंमत यांमध्ये बराच फरक आढळून आला. ग्रामपंचायतीने खरेदी केलेले हे साहित्य शाळांना पुरवले.

ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन कोतवडेकर, सदस्य जीवन कोळवणकर, साक्षी भुते, चेतन सावंत, नरेश विलणकर, स्नेहल वैशंपायन, वैदेही दुधवडकर, सुनिला नलावडे, रंजना विलणकर, रिया सागवेकर, रमेश चिकोडीकर यांनी आपल्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. या पत्रातून त्यांनी कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या क्रीडा साहित्याच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची आणि कारवाईची मागणी केली आहे.

या पत्रामध्ये त्यांनी पाच मुद्दे मांडले असून त्यामध्ये खरेदी केलेल्या सामानाची किंमत आणि बिलावरील रक्कम यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थानिक युवा मंडळ अस्तित्वात नसताना सामान खरेदी केले गेले. चौकशी दरम्यान स्थानिक युवा मंडळांचा जबाब घेण्यात आलेला नाही. ठराविक अंतराने जीएसटी विरहित बिले प्रथम देण्यात आली. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2020 रोजी जीएसटी सहित बिले सादर करण्यात आली.

या विषयाचा ग्रामपंचायतीने बहुमताने मंजूर केलेला ठराव इतिवृत्तामध्येही नमूद करण्यात आला नसल्याचा गौप्यस्फोट उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. ग्रामनिधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत कागदपत्रांमध्ये अदलाबदल करणे, फेरफार करणे असे प्रकार विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवकाकडून घडले आहेत. व भविष्यातही घडू शकतात त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत विद्यमान सरपंच व सचिव यांना ग्रामपंचायत कुवारबाव येथील कार्यालयात दस्तऐवज व आर्थिक व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप अथवा फेरफार करता येणार नाहीत असे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी उपसरपंच सचिन कोतवडेकर आणि दहा सदस्यांनी केली आहे़.

सरपंच आणि ग्रामसेवकाचे जबाब न घेण्यात आल्याचा आरोप

रत्नागिरी पंचायत समिती स्तरावरुन गटविकास अधिकाऱ्यांनी 2 डिसेंबर 2020 रोजी कुवारबाव ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची चौकशी लावली होती. चौकशी दरम्यान सरपंच आणि ग्रामसेवकाचा जबाब घेण्यात आला नाही. तसेच वस्तूंच्या एमआरपीबाबत पंचनामा करण्यात आला नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी 11 डिसेंबर 2020 ची तारीख दिली होती. आणि या तारखेला साहित्य पुरवठादार, शिक्षक यांचे जबाब घेण्यात आले होते. मात्र सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा जबाब गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी दरम्यान घेतला नसल्याचा आरोप उपसरपंच सचिन कोतवडेकर यांच्यासह दहा सदस्यांनी केला आहे. तसेच 15 जानेवारी 2021 रोजी प्रत्यक्ष क्रीडासाहित्य असलेल्या जागेवर पंचायत समिती रत्नागिरीकडून पंचनामा करण्यात आला होता. मात्र चौकशीनंतर कोणती कारवाई केली याबाबत उपसरपंच किंवा दहा सदस्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे उपसरपंच आणि दहा सदस्यांनी म्हटले आहे.

60 रूपयांच्या सापशिडीसाठी 500 रूपये, 190 रूपयांच्या बॅडमिंटन रॅकेटसाठी 1440 रूपये, 1500 रूपयांच्या व्हॉलीबॉल नेटसाठी 3 हजार 890 रूपये, क्रिकेटच्या कीटसाठी 7 हजार रूपये मोजले गेले आहेत. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
– सचिन कोतवडेकर -उपसरपंच, कुवारबाव

आपली प्रतिक्रिया द्या