एलपीजी गॅसचा टँकर उलटल्याने मुंबई गोवा महामार्ग 15 तासांपासून ठप्प

रत्नागिरीतील लांज्याजवळ मुंबई गोवा महामार्गावरील अंजनरी पुलावरून एक एलपीजी टँकर उलटून नदीत पडल्याने मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमुळे या महामार्गावरील वाहतूक तब्बल 15 तासांपासून ठप्प झाली आहे. टँकर हा एलपीजीने भरलेला असल्यामुळे तो नदीतून बाहेर काढल्याशिवाय वाहतूक सुरू केली जाणार नाही. मात्र त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशी महामार्गावर खोळंबले आहेत.

‘भारत पेट्रोलियम’ कंपनीचा हा टँकर असून हा गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास अंजनारी पुलावरून काजळी नदीपात्रात कोसळला आहे. या टँकरचा चालक या अपघातात मृत्युमुखी पडलेला आहे. या टँकरमध्ये जवळपास 24 ते 25 किलो एलपीजी गॅस असून तो लीक होत असल्याने खबरदारी म्हणून मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या टँकरमधून एलपीजी गॅस बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांची टीम गोवा आणि उरणमधून घटनास्थळी दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे.