कोतवडेत चेहरा विद्रूप केलेल्या स्थितीत आढळला वृद्धाचा मृतदेह; हत्या झाल्याचा संशय

रत्नागिरी तालुक्यातील लावगणवाडी येथील बौद्धवाडीच्या स्मशानाजवळील आंब्याच्या बागेत गावातीलच दिलीप रामाणे (वय 60) यांचा मृतदेह चेहरा विद्रूप केल्याच्या अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कोतवडे गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री लावगणवाडी येथे मोठी गर्दी केली होती. चेहरा विद्रूप केलेला असल्याने दिलीप रामाणे यांची हत्या झाल्याचा संशय वाढला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायत हद्दीतील लागणवाडी येथे राहणारे दिलीप रामाणे हे गावातच मोलमजुरीचे काम करतात. शुक्रवारी दिवसभर त्यांना गावातील ग्रामस्थांनी पाहिले होते, परंतु शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता काही तरुण लावगणवाडी येथील रस्त्यावरून जात असताना बागेत त्यांना एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली असल्याचे दिसून आले, परंतु त्यांचा चेहरा विद्रूप झालेला असल्याने घातपताचा संशय बळावला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी गावच्या पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस पाटलांनी तात्काळ या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्थानकाला दिली.

दिलीप रामाणे हे गावातच मोलमजुरीचे काम करत असत. सायंकाळी काम आठवल्यानंतर मित्रांसोबत गप्पा गोष्टी करून ते आपल्या घरी परतत असत, परंतु शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नव्हते. कुटुंबीय त्यांची घरी वाट बघत असतानाच ते बौद्धवाडीच्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या बागेत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याची माहिती ग्रामस्थांनी कुटुंबीयांना दिल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. हे दृश्य हृदय हेलावणारे होते.

रात्री उशिरा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची तपासणी व दिलीप रामाणे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्यांचा मृत्यू पडून झाला की घातपात करण्यात आला? चेहरा विद्रूप कशामुळे झाला? चेहरा विद्रुप करण्यासाठी चिऱ्याचा वापर करण्यात आला आहे का? याचा तपास करण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर उभे राहिले आहे. मध्यरात्री दिलीप रामाणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता.