रत्नागिरीकर ‘इमानदारीत’ घरात बसले

465

रत्नागिरी जिह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिह्यात आजपासून कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. हा लॉकडाऊन 8 जुलैपर्यंत लागू असून अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नका, असा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला आहे.

लॉकडाऊनची पहिल्या दिवशी काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. रिक्षा, बस, खासगी वाहनांना बंदी असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. मुख्य नाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दूध, भाजी, किरणाची दुकाने उघडली होती. जिह्यात कोरोनाबाधितांची संख्या 614 वर पोहचली असून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमू नये, मास्क वापरणे बंधनकारक आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानावर एकावेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक उभे ठेऊ नयेत, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सुरुवातीला जिह्यात लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जात होते. सॅनिटायझरचा वापर होत होता. मात्र गेल्या काही दिवसात त्यामध्ये शिथिलता आली होती. तसेच जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे हा लॉकडाऊन लागू केला आहे-लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हाधिकारी

नाशकातही कारवाईचा बडगा…

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करीत विनामास्क, विनाहेल्मेट आणि डबलसिट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर नाशिक शहर पोलिसांनी बुधवारी ठिकठिकाणी कारवाई केली. लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून म्हणजे 22 मार्चपासून आतापर्यंत सुमारे चार हजार जणांवर अशी कारवाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या