लोटे दुर्घटनेत आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची संख्या पाचवर

खेड तालुक्यातील लोटे येथील डीवाईन केमिकल्स कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या आठ कामगारांपैकी आणखी दोन कामगारांचा ऐरोली नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांचा आकडा पाच वर पोहोचला आहे. अशिष रामलखन मौर्या व विनय मौर्या अशी या दोन कामगारांची नावे आहेत.

लोटे औद्योगिक वसाहतीतील डिवाईन केमिकल या रासायनिक कारखान्यात रविवारी दि. 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला होता. फॅब्रिकेशनचे काम सुरु असताना वेल्डिंगची ठिणगी उडून जमिनीवर पडलेल्या सॉल्व्हन्ट ने पेट घेतला आणि हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये सुतारकाम आणि फेब्रिकेशनचे काम करणारे आठ कामगार गंभीर जखमी झाले होते.

जखमी कामगारांना तात्काळ चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार झाल्यानंतर सात कामगारांना अधिक उपचारांसाठी नवी मुंबईतील ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल केले होते. या दुर्घटनेत सुमारे 70 ते 80 टक्के होरपळलेले कामगार मृत्यूशी झुंज देत होते. मात्र दुसऱ्याच दिवशी गुप्ता नामक कर्मचाऱ्याच्या मृत्यू झाला आणि या दुर्घनेतील पहिला बळी गेला. त्यानंतर आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी दिलीप शिंदे नामक कामगाराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असतानाच काल आशिष रामलाखन मौर्य आणि विनय मौर्य या दोन कामगारांना मृत्यूने गाठले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या आठ कामगारांपैकी पाच कामगारांना मृत्यूने गाठले. तर तीन कामगार आजही ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या कामगारांच्या जीवाला असलेला धोका अद्याप टळलेला नसल्याची माहिती मिळत आहे.

लोटे औद्योगीक वसाहतीत होणाऱ्या जीवघेण्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत मात्र येथील कारखाना व्यवस्थापन उत्पादन घेताना आवश्यक ती खबरदारी घेत नसल्याने या औद्योगिक वासाहतीत काम करणाऱ्या कामगारांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. एखादा अपघात झाला, एखाद्याच्या बळी गेला की कारखानदार त्याच्या नातेवाईकाला तुटपुंजी मदत देऊ करतात आणि सारे विसरून जातात. . नातेवाईकाने मदत घेण्यास नकार दिला तर दबाव आणण्याच्या प्रयत्न करतात. त्यामुळे या औद्योगीक वसाहतीतील कामगार सुरक्षित राहिलेला नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काही तरी काम हवे म्हणून हे कामगार जीवावर उदार होऊन काम करत आहेत. येथील कारखानदार याचाच फायदा उचलत कामगारांच्या जीवाशी खेळत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.