‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत 100 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण; सारीचे 2361, कोविडचे 291 रूग्ण सापडले

रत्नागिरी जिल्हयात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात 100 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यामध्ये एकूण 2361 सारी आणि इलीचे रुग्ण शोधण्यात आले आहेत. या रुग्णांमधून 291 कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.

कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हयातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा भेटी देऊन संशयित कोविड रुग्ण शोधणे हा महत्वाचा उद्देश समोर ठेवून 15 सप्टेंबर 2020 पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येत असून पहिली फेरी 10 ऑक्टोबर पर्यंत घेण्यात आली. त्यामध्ये 15 लाख 42 हजार 612 लोकसंख्या आणि 4 लाख 40 हजार 572 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दीष्ट होते. त्यासाठी 686 टीम मध्ये 2029 कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमेसाठी विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली आहे. तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.

तपासणी दरम्यान कोमॉर्बीड आजाराचे म्हणजे डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, किडनी विकाराचे 1 लाख 12 हजार 079 रुग्ण आढळून आले. या मोहिमेंतर्गत कोरोना रुग्णांचे निदान केल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला आजार होण्याची साखळी खंडीत करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येमध्ये लक्षणीय घट आढळून येत आहे.

14 ऑक्टोबर 2020 ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दुसरा टप्पा घेण्यात येत आहे. यामध्ये 686 पथकांमार्फत पुन्हा एकदा जिल्हयातील सर्व घरांचे पर्यायाने सर्व लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, सभापती, आरोग्य व बांधकाम समिती महेश म्हाप व सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयाने ही मोहिम जिल्हयात राबविण्यात आली. रत्नागिरी जिल्हयातील नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल सर्वांनी धन्यवाद दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली दिली.

आपली प्रतिक्रिया द्या