कोरोनाबाधितांच्या अंत्यविधीवरून होणाऱ्या वादावर लवकरच तोडगा – उदय सामंत

1240

नगरपरिषदेच्या रुग्णालय आणि महिला रूग्णालयात लवकरच उपचारांची सेवा सुरू करणार आहोत असे   सांगतानाच 31 मे पर्यंत रूग्णांच्या वाढीचा विचार करून बेड, व्हेंटिलेटर आणि आयसीयू आपल्याकडे उपलब्ध आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीवरून वाद होत आहेत त्यावर विद्युतवाहिनीचा पर्याय अाहे. सर्वांच्या भावनांचा विचार करून, सर्वांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊन आम्ही विचार करू, जिल्हाधिकारी लवकरच त्याबाबत बैठक घेतील. जर स्वतंत्र जागा उपल्बध झाली तर आम्ही स्वतंत्र कोविड स्मशानभूमी उभारू मात्र त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

जिल्हा रूग्णालय हे कोविड रूग्णालय झाल्याने जिल्हा रूग्णालयात आलेल्या इतर रूग्णांना खासगी रूग्णालयात पाठविले जात आहे. त्यांच्यासाठी जिल्हा रूग्णालयाची दुसरी शाखा म्हणून नगर परिषद रूग्णालय आणि महिला रूग्णालय सुरू करत आहोत. नगर परिषद रूग्णालयाची जबाबदारी डॉ. पाटोदेकर आणि महिला रूग्णालयांची जबाबदारी डॉ.सुभाष चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे.

दरेकर फडणवीसांना खूष करायला बोलतात
विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पहाणी केल्यानंतर आरोग्य यंत्रणेत बदल केला का? या प्रश्नावर सामंत म्हणाले की, दरेकर फडणवीसांना खूष करण्यासाठी बोलतात. आम्ही आमचे काम करतोय दरेकर त्यांचे काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षात काय चालले आहे ते पहावं अशी खोचक टीका सामंतांनी केली.

नगरपरिषद रूग्णालयाची पहाणी
मजगाव रोडवर नगरपरिषदेच्या रुग्णालयासाठी  बहुमजली इमारत पूर्णपणे बांधून तयार आहे. या इमारतीची पाहणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री  मंत्री उदय सामंत यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापुरकर, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे उपस्थिती होते.  जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोराना रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहे. यामुळे इतर रुग्णांवर येथे उपचार  करण्यात अडचणी आहेत. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने ही इमारत वापरण्यास घ्यावी व येथे साधन सुविधांसह प्रथम ओपीडी सुरू करावी असे सामंत म्हणाले.या चार मजली इमारतीत ओपीडीसह  शस्त्रक्रिया तसेच रुग्णांसाठी वार्ड देखील सुरू करता येणार आहेत.  या ठिकाणी त्यास्वरूपाची खोल्यांची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच वीज व पाणीपुरवठा ही या ठिकाणी सुरु आहे. या ठिकाणी आवश्यक त्या डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची व्यवस्था केल्यास येथे रुग्णसेवा सुरू होणार आहे. मुख्य जिल्हा रुग्णालयात पासून दूर असल्याने व नगरपालिका हद्दीत असल्याने कोरोनाचा धोका टाळून येथे पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू करण्याची गरज होती त्यासाठी या इमारतीचा वापर होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या