रत्नागिरीत मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र सुरू

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर उपपरिसर असे नामकरण आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज पासून उपकेंद्रात लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की,जयू भाटकर मला मंत्रालयात भेटले होते तेव्हा त्यांनी मुंबई विद्यापीठाला चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी मी कुलगुरूंना फ़ोन करून नामांकरणाचा ठराव काऊन्सिलच्या बैठकीत करण्याची सूचना केली होती. चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव उपकेंद्राला लाभणे हा रत्नागिरीकरांचा सन्मान आहे. पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव उपकेंद्राला देताना या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित आहेत याची आठवणही सामंत यांनी करून दिली.

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र आजपासून सुरू होत आहे. उदय सामंत म्हणाले की, दीड वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत मी रत्नागिरीला शैक्षणिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच रत्नागिरीत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू होणार असून त्यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय ग्रंथालय रत्नागिरीत उभारणार आहोत. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

चरित्रकार कै.धनंजय कीर यांचे नातू डॉ.शिवदीप कीर यांनी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला पद्मभूषण धनंजय कीरांचे नाव दिल्याबद्दल राज्य सरकार आणि विद्यापीठाचे आभार मानले. ते म्हणाले की,रत्नागिरीतील आमच्या मूळ घरात आम्ही चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक अभ्यासिका सुरू करणार असून धनंजय कीर यांनी लिहिलेली सर्व चरित्रे विद्यार्थ्यांना अभ्यासा करिता उपलब्ध करणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या