रत्नागिरीत डेंग्युची साथ, 476 घरांमध्ये सापडल्या एडीस इजिप्ती डासांच्या अळ्या

सध्या डेंग्युची साथ पसरली असल्यामुळे आरोग्य विभागाने सर्वेक्षण मोहिम सुरु केली आहे. जुलै महिना हा डेंग्यु प्रतिबंधक महिना म्हणून मोहिम राबवली जात आहे. 1 ते 8 जुलै दरम्यान सर्वेक्षण मोहिमेतून 7 हजार 5 92 घरांमध्ये 26 हजार 868 पाणी साठे असलेली भांडी तपासण्यात आली. त्यापैकी 476 घरातील 1 हजार 05 9 पाण्याच्या भांड्यांमध्ये एडीस इजिप्ती डासांच्या अळ्या सापडल्या.

आरोग्य विभागाने 9 ठिकाणी गप्पी मासे सोडले आहेत. आतापर्यंत 4 हजार 0 96 घरांमध्ये धूरफवारणी केली आहे. तसेच 1 हजार 553 तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने तपासून त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. ही मोहिम 31 जुलैपर्यंत राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.संतोष यादव यांनी दिली.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून डेंग्यु आजार रोखण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात असून जनजागृतीवर भर दिला जात आहे. जनतेने स्वतःहून सहभागी होऊन विविध उपाययोजना राबवल्यास डेंग्यु आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे.