
घरगुती वादातून सख्खा भाऊच भावाच्या जीवावर उठला. धारदार हत्याराने वार करत भावानेच भावाची हत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दापोलीतील उन्हवरे गावात घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. विनोद गणपत तांबे असे मयताचे नाव आहे. दापोली पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. रवींद्र गणपत तांबे असे अटक आरोपीचे नाव आहे.
उन्हवरे येथील बौद्धवाडी येथे तांबे कुटुंब राहते. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र शनिवारी काही कारणातून दोघा भावांमध्ये वाद झाला. याच वादातून रवींद्रने विनोदवर धारदार हत्याराने वार केला. यात विनोदचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी संशयित आरोपी रवींद्र तांबे याला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेच्या तपासासाठी चिपळूण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र राजमाने आणि दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, फॉरेन्सिक पथकाला देखील तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे.