मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे गस्ती दरम्यान पोलीसांनी एका चारचाकी वाहनाची झडती घेतली असता, त्या गाडीतील तिघांकडे गांजा हा अंमली पदार्थ सापडला. पोलीसांनी त्या तिघांकडून 4 लाख 41 हजार 180 रुपये किमतीचा 22.059 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी आणि खेड पोलीसांनी संयुक्तरित्या केली.
खेड येथे गस्त घालत असताना पांढऱ्या रंगाचे एक चारचाकी वाहन रस्त्यावर उभे होते. त्या गाडीचे दोन्ही दरवाजे उघडे होते. त्या गाडीत चालकासह अन्य दोन इसम बसले होते. त्या दोघांच्या मांडीवर बॅगा होत्या. पोलीसांनी पाहणी केली असता त्या तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलीसांनी गाडीची झडती घेतल असता बॅगमध्ये गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. पोलीसांनी गाडीतील उदयसिंह मदनसिंह चुंडावत (वय 37), विशाल विद्याधर कोकाटे (वय 24) आणि सिध्देश उदय गुजर (वय 32) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडील 4 लाख 41 हजार 180 रुपये किमतीचा 22.059 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. तसेच 6 लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर, पोलीस निरिक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरिक्षक येवले, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, अतुल कांबळे, वैभव ओहळ यांनी केली.