रत्नागिरीत पिंपळवाडी धरणाचा धोका टळला; स्थलांतरीत ग्रामस्थांना परतण्याचे आवाहन

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील अतिवृष्टीदरम्यान भितींला भगदाड पडलेल्या डुबी नदीवरील पिंपळवाडी धरणाच्या डागडुजीचे काम पाटबंधारे विभागाने युद्धपातळीवर सुरु केले आहे. धरणाला निर्माण झालेला धोका आता पुर्णपणे टळला असल्याने अतिवृष्टीदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणुन ज्या ग्रामस्थांना स्थलांतरीत करण्यात आले होते त्यांनी आता पुन्हा आपापल्या गावात परतावे असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान डुबी नदीवर बांधण्यात आलेल्या पिंपळवाडी धरणाच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली होती. हे वाढलेले पाणी थेट सांडव्यावरून वाहू लागल्याने पाण्याच्या प्रवाहाने धरणाच्या मार्गदर्शक भितींची माती वाहून गेल्याने धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला होता. धरणाला धोका निर्माण होऊन अनर्थ ओढवू नये याबाबत खबरदारी घेत महसुल विभागाने धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या सात गावातील ग्रामस्थांना तत्काळ स्थलांतरीत होण्याच्या सुचना दिल्या होत्या.

2019 साली चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती अनुभवलेली असल्याने धरणाच्या पायथ्याखाली वसलेल्या गावातील ग्रामस्थांनी स्थलांतरीत होणे पसंत केले होते. पावसाचा जोर कमी झाल्यावर पाटबंधारे विभागाच्या अलोर येथील यांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सपूर्ण धरणाची पाहणी केली यावेळी सुदैवाने धरणाला कुठेही गळती लागलेली नसल्याचे स्पष्ट झाले आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. धरण सुरक्षित असल्याचे खात्री होताच पाटबंधारे विभागाने पावसामुळे धरणाच्या मार्गदर्शिका भिंतीला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

अतिवृष्टीवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत झालेली वाढ आता कमी झाली असल्याने धरणाला आता कोणताही धोका उरलेला नाही. त्यामुळे अतिवृष्टीदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून ज्या ग्रामस्थांना स्थलांतरित व्हावे लागले होते त्यांनी आता आपापल्या गावात परतायला हरकत नाही, आता धरण पुर्णपणे सुरक्षित असल्याने धरणफुटीबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता गोविंद श्रीमंगले यानी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या