फुलांच्या वर्षाव करत डॉ. प्रवीण मुंढे यांना रत्नागिरीकरांचा निरोप, पोलीस कवायत मैदानावर ऐतिहासिक सोहळा

बदली हा शासकीय अधिकाऱ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. बदलीनंतर शब्दसुमनाने अनेकांना निरोप मिळतो पण दिमाखदार सजवलेल्या गाडीतून फुलांचा वर्षाव करत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निरोप देण्याचा एेतिहासिक क्षण आज रत्नागिरीकरांनी अनुभवला. डॉ.मुंढेवर होणाऱ्या या फुलांच्या वर्षावात पोलीस अधिकारी, कर्मचारी,नागरिक आणि जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा सुगंध दरवळत होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाल्याने आज त्यांना नागरिक आणि पोलीस दलाच्या वतीने निरोप देण्यात आला. याप्रसंगी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रवीण पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, उपविभागीय अधिकारी सुर्यवंशी, लक्ष्मण खाडे, पोलीस निरीक्षक शिरीष सासने, अनिल विभूते, अनिल लाड, सुरेश कदम व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मनगोतात पोलीस अधीक्षकांविषयी आपले अनुभव सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.

माझ्या पतीला सांगेन तुम्हाला आव्हानात्मक काम आहे- इंदूराणी जाखड

जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड म्हणाल्या की, अनेकांच्या मनोगतातून डॉ. प्रवीण मुंढे यांनी केलेल्या कामाची माहिती मिळाली.आता रत्नागिरीला जे नवीन पोलीस अधिक्षक येणार आहेत मोहित गर्ग हे माझे पती आहेत. डॉ. मुंढे यांच्या कामाचा आवाका पाहिल्यानंतर मी माझ्या पतीला आज नक्कीच निरोप देईन की तुम्हाला आव्हानात्मक काम करायचे आहे.

रत्नागिरी जिल्हा सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात प्रथम- डॉ. प्रवीण मुंढे 

निरोपाच्या भाषणात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानताना त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा मिळाल्याने काम करू शकलो. गेली दोन वर्ष कशी गेली हे कळलेच नाही.रत्नागिरीत काम करता म्हणजे स्वर्गात काम करून त्याचा पगार घेता असे गौरवोद्गार काढताना डॉ.मुंढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्हा हा कायदा आणि शिस्तीचे पालन करणारा जिल्हा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर रत्नागिरी राज्यातील सर्वात सुरक्षित जिल्हा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या