कोरोनामुळे रत्नागिरीतील रघुवीर घाटात पर्यटकांना बंदी, घाट एक महिन्यासाठी बंद

मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कलम 144 लागू आहे. असे असताना रत्नागिरीतील निसर्गरम्य रघुवीर घाटात पर्यटकांची गर्दी झाल्याने खेडचे प्रांताधिकारी सोनोनो यानी पुढील आदेश होईपर्यंत रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी घाटवारी करणाऱ्यांची निराशा झाली.

रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्याला जोडणारा हा घाट पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.  गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे  या घाटातून दिसणारे निसर्गसौंदर्य चांगलेच बहरू लागले आहे. उंच कड्यावरून खाली फेसाळत कोसळणारे अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत.  मनाला मोहून टाकणारे हे सौंदर्य पाहण्यासाठी रविवारी  या घाटात शेकडो पर्यटक पोहोचले होते. संध्याकाळी उशिरा खेड पोलिसांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी रघुवीर घाटात जाऊन सर्व पर्यटकांना हटकले आणि घरी पाठवले. रघुवीर घाटात असलेले हॉटेल देखील ग्रामपंचायतीने सील करून तसा अहवाल प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर करावा असा आदेश प्रांताधिकारी सोनोने यांनी दिला आहे.

जिल्ह्यात जमावबंदी असताना खेड मधील रघुवीर घाटात झालेली हि मोठी गर्दी कोरोना संक्रमण आणि अतिवृष्टी च्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे.  तालूक्यात पावसाचा जोर सुरूच आहे. खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील खोपी येथे मासे पकडण्यासाठी नदीत गेलेल्या खेडच्या  31 वर्षीय तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. महेश वसंत निकम मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या