रत्नागिरीत पावसाचा कहर; शेतात, घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसाने गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. रत्नागिरी शहरात बाजारपेठ परिसरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरुन नुकसान झाले़. पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातही पावसाचे पाणी शेतामध्ये शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यात मौजे वायंगणी येथे दरड कोसळली. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचे काम सुरु आहे. कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मौजे कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. संगमेश्वर रस्त्यावर झाडे कोसळल्याने हा रस्ता बंद होता. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाडे हटवण्याचे काम सुरु आहे. कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे स्वप्नाली सिध्दार्थ कांबळे यांच्या घराच्या शेजारी दरड कोसळली.

या कुटूंबाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंशतः नुकसान झाले. पोमेंडी येथील टेंभ्ये पूल येथे एम एच ए एफ 4216 ही मोटारसायकल वाहून गेली. लांजा तालुक्यात मौजे लांजा वेरळ रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचे काम सुरु आहे. कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 98.69 मिमी तर एकूण 888.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये मंडणगड 51 मिमी, दापोली 99.70 मिमी, खेड 79.80 मिमी, गुहागर 97.90 मिमी, चिपळूण 32.40 मिमी, संगमेश्वर 123.90 मिमी, रत्नागिरी 193.30 मिमी, राजापूर 114.80 मिमी, लांजा 95.40 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या